नवी दिल्ली : दररोज वापरात येणारे म्हणजेच ‘फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स’ (एफएमसीजी) उत्पादन करणारी कंपनी डाबर आपला मसाला ब्रँड बादशाह (Badshah Masala) परदेशी बाजारात घेऊन जात आहे. गेल्या वर्षी कंपनीने याचे अधिग्रहण केले होते. डाबर इंडियाचे सीईओ मोहित मल्होत्रा यांना चालू आर्थिक वर्षांत कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विक्रीत ब्रँडचा वाटा सुमारे 4 टक्के असेल अशी अपेक्षा आहे.
अमेरिका, ब्रिटन आणि पश्चिम आशियामध्ये स्थायिक झालेल्या परदेशी लोकांना लक्ष्य करण्याची कंपनीची योजना आहे. सध्या कंपनी नियामक मान्यता मिळवण्याच्या आणि त्यासाठी उत्पादन वाढवण्याच्या प्रक्रियेत आहे. याव्यतिरिक्त देशांतर्गत बाजारपेठेत डाबरने बादशाह मसाला उत्तर पूर्व आणि दक्षिणेकडे नेण्यासह महाराष्ट्र आणि गुजरातच्या पश्चिमेकडील बाजारपेठांमध्ये सादर करण्याची योजना आखली आहे.
”बादशाहचा व्यवसाय वाढत आहे आणि यावर्षी आमच्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यवसायात तीन ते चार टक्के योगदान दिले पाहिजे. आम्हाला यातून मोठ्या नफ्याची अपेक्षा आहे. परदेशातील बाजारपेठेत बादशाहसाठी मोठी व्यवसाय संधी आहे. विशेषतः ब्रिटन आणि अमेरिकेत जिथे परदेशी भारतीयांची संख्या खूप जास्त आहे, जे भारतीय मसाले वापरतात”, असे मोहित मल्होत्रा यांनी सांगितले.