नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी, 23 जुलै रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत एनपीएस वात्सल्य ही आणखी एक योजना जाहीर केली आहे. एनपीएस वात्सल्य अंतर्गत, तुम्ही आता तुमच्या अल्पवयीन मुलाच्या नावावर एनपीएस खाते उघडून त्यात पैसे जमा करू शकाल. मूल 18 वर्षांचे झाल्यानंतर, हे एनपीएस वात्सल्य नियमित एनपीएसयोजनेत रूपांतरित केले जाऊ शकते.
एनपीएसबाबत लवकरच योजना
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले की, त्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणालीबाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या चिंतेची जाणीव आहे. एनपीएसबाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या चिंता दूर करण्यासाठी लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले. सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा वर्ग एनपीएसवर खूश नाही. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची त्यांची मागणी आहे.
एनपीएस पुनरावलोकन करणारी समिती
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी माहिती दिली की एनपीएसचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने खूप काम केले आहे. आतापर्यंतच्या प्रगतीवर समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. समितीचा अंतिम अहवाल प्राप्त होताच एनपीएसबाबत घोषणा केली जाईल. अर्थमंत्री म्हणाल्या की, नरेंद्र मोदी सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर आम्ही विचार करत आहोत.