मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांचं उद्योग जगतात मोठं नाव आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक कंपन्या विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यात आता अंबुजा सिमेंट कंपनीने हरित ऊर्जा प्रकल्पांवर 6 हजार कोटी खर्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनी ही गुंतवणूक गुजरातमध्ये 600 मेगावॅट सौर ऊर्जा, 150 मेगावॅट पवन ऊर्जा उत्पादन आणि राजस्थानमध्ये 250 मेगावॅट पवन ऊर्जा उत्पादनावर करणार आहे.
सध्या अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यात व्यवसायात आहेत. त्यात अंबुजा सिमेंट व्यतिरिक्त अदानी ग्रुपच्या कंपन्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि एसीसी लिमिटेड यांनी 2050 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय ठेवले आहे. अदानी समूहाने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली.
त्यात अंबुजा सिमेंट ग्रीन एनर्जीमध्ये प्रवेश करणार आहे. गुजरातमध्ये 600 मेगावॅटचा सौर प्रकल्प आणि 150 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यात वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार केला जाईल. या पोर्टफोलिओमध्ये सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा असेल. हे प्लांट गुजरात आणि राजस्थानमध्ये असतील. यासह कंपनीकडे सुमारे 1000 मेगावॅट ग्रीन पॉवरची क्षमता असेल, असेही सांगितले जात आहे.