Pune Crime : पुणे : पुणे शहर आणि परिसरात सायबर गुन्हेगारी वाढत आहे. पार्ट टाईम जॉबमधून जास्तीचा परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांकडून कोथरुड परिसरातील २५ वर्षांच्या तरुणीला ११ लाखांचा गंडा घातला. तरुणीला रिल्स लाईक करण्याचे काम देण्यात आले. मात्र, त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तरुणीची फसवणूक करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिनल माणिकराव निखाडे (वय २५, रा. कोथरुड) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर पोलिसांनी टेलीग्राम युजर आयडी धारकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२३ दरम्यान तरुणीच्या राहत्या घरी ऑनलाइन पद्धतीने घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना देविका मीलर आणि अंजली शर्मा या टेलिग्राम युजर आयडी धारकांनी संपर्क केला. त्यांना देविका मिलर एचआर असिस्टंट आॅफ इनफ्ल्यूएन्सर मार्केटींग हब कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचा विश्वास संपादन केला. तरुणीला रिल्स लाईक करण्याचा टास्क देऊन हा टास्क पूर्ण केल्यानंतर जास्त कमिशन मिळेल असे सांगितले.
तरुणीने सायबर चोरट्यांवर विश्वास ठेऊन त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन १० लाख ८९ हजार ९५२ रुपये पाठवले. त्यानंतर कोणताही टास्क न देता आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.