पुणे : मैत्रिणीच्या सोशल मिडिया खात्यावर संदेश पाठविल्याने जाब विचारणाऱ्या तरुणावर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली आहे. अमोल राजाराम घाटे (वय २५, रा. माळवाडी, हडपसर, मूळ रा. नांदेड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
तर अमर बसवराज जमादार (वय २०, रा. गोपाळपट्टी, मांजरी), अमन अशोक नरोटे (वय १९, रा. अष्टविनायक कॉलनी, काळेपडळ, हडपसर), श्रीपती संतोष सरोदे (वय १९, रा. साडेसतरानळी, हडपसर) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घाटे याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसापूर्वी अमोल घाटे याच्या मैत्रिणीला आरोपींनी सोशल मिडियावर मॅसेज पाठविला होता. दरम्यान, हडपसर भागातील माळवाडी परिसरातून घाटे आणि त्याचा मावस भाऊ सुदर्शन दासवड जेवण करुन रात्री घरी निघाले होते. यावेळी आरोपी जमादार, सरोदे, नरोटे आणि साथीदार थांबले होते.
त्यावेळी संधी साधून, ‘मैत्रिणीच्या मोबाइलवर संदेश का पाठविला’, अशी विचारणा घाटेने आरोपींकडे केली. जाब विचारल्याचा राग मनात ठेवून आरोपींनी घाटेला शिवीगाळ करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दासवड याच्यावर वार करुन आरोपी पळाले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना पकडले असून, पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.