मुंबई : एकाच मुलीवर दोन जिवलग मित्राचा जीव जडल्याने या प्रेमाच्या त्रिकोणातून एका महाविद्यालयीन तरुणाने आपल्या जिवलग मित्रावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामुळे मालाड परिसरात एकच खळबळ उडली असून पोलिसांनी हल्लेखोराला अवघ्या २४ तासाच्या आत अटक केली आहे.
आयुष खेडकर (२० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर या हल्ल्यात जयेश सावंत (वय-२०) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष खेडकर आणि जयेश सावंत हे दोघेही मित्र असून गोरेगाव परिसरातील पाटकर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. या दोघांचे याच महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर प्रेम होते.
जयेश सावंत याचे एका मुलीवर मागील सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र त्या दोघांचाही काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर त्या तरुणीच्या आयुष्यात आयुष खेडकर हा तरुण आला होता.
दरम्यान, जयेशने आपले गमावलेले प्रेम पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ही बाब आयुष्य खेडकर याला खटकत होती. आपल्या प्रेमात अडथळा नको या इराद्याने त्याचा काटा काढण्याचा बेत आखला. यासाठी आयुष खेडकर याने जयेशला आपल्या घरी असलेले पाळीव पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी बोलावले.
त्यानंतर जयेश सावंत हा शुक्रवारी रात्री घरी गेला. मात्र घरात प्रवेश करतात पाठीमागून आयुष खेडकर याने जयेश सावंत याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयेश याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधायक कलम ३०७ प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या २४ तासाच्या आज मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी आयुष खेडकरला आज न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास मालाड पोलीस करत आहेत.