Yerwada Jail : कैद्यांनी चोरून मोबाइल वापरू नये, यासाठी येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड टेलिफोन बूथ सुविधा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय कैद्यांना मोबाइल पुरविण्याचा संशय असणाऱ्या कर्मचाऱ्यांची राज्याच्या इतर कारागृहात बदली देखील करण्यात आली. कैद्यांची आणि कर्मचाऱ्यांची झडती वाढविण्यात आली. तरीही कारागृहात मोबाइल सापडतच आहेत. मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षाव्यवस्था भेदून कैद्यांसाठी दहा मोबाइल आतमध्ये नेण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. तीन महिन्यांत कैद्यांकडे दहा मोबाइल सापडले आहेत. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.(Yerwada Jail)
येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड टेलिफोन बूथ सुविधा सुरू करण्यात आली.
येरवडा कारागृहात एप्रिल ते सहा जुलै २०२३ या कालावधीत दहा मोबाइल, सीम कार्ड, चार्जर, मोबाइलच्या अतिरिक्त बॅटऱ्या सापडल्या आहेत. एप्रिल महिन्यातच कारागृह प्रशासनाने ड्रोनद्वारे कारागृह आणि कैद्यांवर देखरेख ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, कैद्यांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतरही बेकायदा पद्धतीने मोबाइलचा वापर थांबलेला नाही.(Yerwada Jail)
कारागृहातील कैद्यांनी बराकीच्या बाथरूममध्ये, माडी गेट आणि अंतर्गत भिंतीत मोबाइल लपवून ठेवण्याच्या जागा शोधल्या आहेत. कारागृहात मोबाइलचा वापर रोखण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाही कारागृहात आतमध्ये मोबाइल जात असल्याने ही गंभीर बाब मानली जात आहे.(Yerwada Jail)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा कैद्यांकडे दोन मोबाईल, दोन बॅटऱ्या, चार्जर आणि एक सिमकार्ड सापडले. याप्रकरणी महेश माने, अजय कांबळे, अनिकेत चौधरी आणि नरेश दळवी या न्यायाधीन (कच्चे) कैद्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Yerwada Jail)
येरवडा कारागृहात सर्कल एकमधील बराक चारमध्ये काही कैदी मोबाइल वापरत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कैद्यांची झडती घेतली. त्या वेळी माने आणि कांबळे यांच्याकडून मोबाइल जप्त केले. तर, चौधरीकडून मोबाइलचा चार्जर आणि दळवीकडे सिमकार्ड सापडले. बराकीतील चार कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या, चार्जर आणि सीमकार्ड सापडले.(Yerwada Jail)
या घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना आणि सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. तरीही या घटना थांबलेल्या नाहीत. प्रत्येक तुरुंग अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांची कसून झडती घेऊनही कारागृहात वारंवार मोबाइल सापडत असल्याने पोलिसांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
– ५ एप्रिल : सर्कल एकमधील तीन क्रमांकाच्या बराकीत मोबाईल आढळला.
– २० एप्रिल : अंडा सेलमध्ये मोबाईल
– १९ मे : सर्कल एकमधील खिडकीत मोबाईल
– ६ जून : आठ क्रमांकाच्या बराकीत सिमकार्ड नसलेला मोबाईल सापडला.
– २८ जून : येरवडा कारागृहाच्या आवारात चार मोबाईल सापडले. सात जणांवर गुन्हा दाखल.(Yerwada Jail)