पुणे : पुणे महापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता भागात आज गुरुवारी (ता.३) घडली. .
दिनेशकुमार गौड (वय २५, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. हरिप्रताप यादव (वय ४४, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालक रणजित भगवान झिंजे (वय ३८) च्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौड आणि यादव दोघे मूळचे उत्तरप्रदेशातील आहेत. दोघे जण सिंहगड रस्ता परिसरात मजुरी करतात. दोघे भाजी खरेदीसाठी सिंहगड रस्ता परिसरात आले होते.
दरम्यान, भाजी खरेदी करुन दोघे माघारी निघाले होते. तेव्हा लक्ष्मी विनायक कॉम्प्लेक्स इमारतीसमोर डंपरने दिनेशकुमारला धडक दिली. डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी डंपर चालकाच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत चंदनशिव करीत आहेत.