Yawat News : यवत : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पडवी येथे पतीने पत्नीला लोखंडी सळईने हातावर व डोक्यावर गंभीर मारहाण केली. पिडितेचे आई-वडील तिला वाचवण्यासाठी गेले असता, त्या नराधमाने सासू-सासर्यांना देखील गजाने हातावर व पायांवर मारहाण करून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी नराधम पतीवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी पिडीत महिलेने यवत पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून, महेश तुळशीराम शितोळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला काही दिवसांसाठी माहेरी गेली होती. शुक्रवारी (ता. ७) ती पन्हा सासरी पडवी येथे आली. या वेळी संतप्त झालेल्या पती महेश याने पत्नी व तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
याबाबत विचारणा केली असता, महेश याने पत्नीला लोखंडी सळईच्या तुकड्यांनी हातावर, डोक्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी पिडीत महिलेचे आई-वडील तिला वाचवण्यासाठी पुढे आले असता, महेश याने त्यांना देखील गजाच्या साह्याने हातावर व पायांवर मारहाण करून जखमी केले. घटना घडत असताना महेशच्या आई-वडिलांनी देखील पिडीतेसह तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पती महेश तुळशीराम शितोळे, सासरे तुळशीराम सिताराम शितोळे व सासू शकुंतला तुळशीराम शितोळे हे शारीरिक व मानसिक त्रास देत असून, छळ करत असल्याची तक्रार पिडीत महिलेने यवत पोलीस स्टेशन येथे दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पती महेश शितोळे, सासरे तुळशीराम शितोळे व सासु शकुंतला शितोळे (सर्व रा. पडवी, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार भगत करीत आहेत.