राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कासुर्डी टोलनाका येथे बुधवारी (दि.२०) साडेतीनच्या सुमारास एका वाहनातून तब्बल १०५० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. सोलापूरवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करत असताना स्कॉर्पिओतून (एम.एच.१२ ई.जी.११४१) काळ्या रंगाचे ३० कॅन आढळून आले. याची तपासणी केली असता त्यामध्ये १०५० लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले.
शौकतअली हसन पटेल (वय ३८, सध्या रा.मार्केटयार्ड आंबेडकरनगर झोपडपट्टी गल्ली नं.४ बिबवेवाडी, पुणे, मूळ रा.खेडा, ता.अबजलपुर, जि.कलबुर्गी, कर्नाटक) व दत्ता कुमार चव्हाण (वय २२, सध्या रा. मार्केटयार्ड आंबेडकरनगर झोपडपटटी गल्ली नं.4 बिबवेवाडी, पुणे, मूळ रा.निलंगा आंबेडकरनगर, ता.निलंगा जि.लातूर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील वाहनासह ९० हजार रुपये किमतीची ३५ लिटरचे ३० कॅनसह एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत पोलीस नाईक अजित काळे यांच्या फिर्यादीवरून शौकतअली हसन पटेल व दत्ता कुमार चव्हाण यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगताप हे करत आहेत.