Yavat News : यवत, (पुणे) : जमिनीचा ताबा घेण्यावरून झालेल्या वादात एका शेतकऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दापोडी, (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. 21) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह 5 जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Yavat News

प्रशांत अंकुश रूपनवर, राहुल तुकाराम रूपनवर, अंकुश बबन रूपनवर, तुकाराम बबन रूपनवर, चतुराबाई तुकाराम रूपनवर सर्व रा. दापोडी ता दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल बापुराव रूपनवर (वय-40, रा. दापोडी) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Yavat News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल रूपनवर मंगळवारी (ता. 21) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आपली आई सुनंदाबाई आणि पत्नी मेघा यांच्यासह शेतात काम करत होते. यावेळी त्याच गावातील आरोपी प्रशांत रूपनवर, राहुल रूपनवर यांच्यासह इतर तीन जण तिथे आले. “हे क्षेत्र आमचे आहे, आम्ही याचा ताबा घेणार,” असे म्हणत त्यांनी वाद सुरू केला. त्यावर अमोल रूपनवर यांनी “तुम्ही कोर्टाचा आदेश घेऊन या आणि मग ताबा घ्या,” असे सुनावले. Yavat News
अमोल यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना मारहाण सुरू केली. यावेळी आरोपी राहुल रूपनवर याने अमोल यांच्या पत्नीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पत्नीला वाचवण्यासाठी अमोल गेले असता, आरोपीने त्यांना काठीने हात, पाय आणि डोक्यात बेदम मारहाण केली. मुख्य आरोपी प्रशांत रूपनवर याने “तुला जिवंत सोडत नाही” अशी धमकी देऊन अमोल यांच्यावर कोयत्याने खुनी हल्ला केला. अमोल यांनी प्रसंगावधान राखून वार हुकवल्यामुळे त्यांचा जीव वाचला, मात्र आरोपी त्यांच्या मागे धावत सुटल्याने कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली होती. Yavat News
दरम्यान, यवत पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत वरील पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) खुनाचा प्रयत्नसह विविध गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







