पुणे: पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आता एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ डिसेंबर 2025 मधील एका पबमधील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये मुख्य आरोपी सिया गोयल हातात बिअरची बाटली घेऊन फोनवर कोणाशी तरी संतप्तपणे बोलताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पबमध्ये मोठ्या आवाजात संगीत सुरू असतानाही सिया फोनवर जोरात बोलताना दिसते. ती समोरच्या व्यक्तीवर राग व्यक्त करत, “आधी तू स्वतः माझ्याशी चीट केलंस आणि नंतर मलाच फोन करतोस,”असे म्हणताना ऐकू येते. यावेळी ती अत्यंत आक्रमक दिसत असून संभाषणादरम्यान शिवीगाळ करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या व्हिडिओमुळे सिया नेमकी कोणाशी बोलत होती, हा प्रश्न उपस्थित होत आहे. फोनवरील व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी सोशल मीडियावर याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, या व्हिडिओच्या आधारे कोणत्याही नव्या व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध असल्याची अधिकृत पुष्टी पोलिसांकडून करण्यात आलेली नाही.
याआधी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांचा क्रिकेट सामना पाहतानाचा व्हिडिओही समोर आला होता. त्यानंतर आता पबमधील हा व्हिडिओ पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, या प्रकरणात सियाचे वडील प्रवीण गोयल यांनीही पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत, सिया आणि चेतन यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती आपल्याला नव्हती, असा दावा केला आहे. तसेच ही माहिती आधी मिळाली असती तर सिया आणि केतन यांच्या विवाहाचा निर्णय पुन्हा विचारात घेतला असता, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओची सत्यता आणि त्यातील फोनवरील संभाषणाचा तपास पोलीस करत असून, संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.







