पुणे : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास अधिकृतपणे आपल्या हाती घेतला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने या तपासाची मुख्य जबाबदारी उपअधीक्षक पुरण कुमार या अनुभवी अधिकाऱ्याकडे सोपवली आहे.त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आणखीन वेग येणार आहे

8 जून 2020 रोजी मालवणी येथील एका बहुमजली इमारतीवरून पडल्याने 28 वर्षीय दिशा सालियनचा गूढ मृत्यू झाला होता. त्या वेळी स्थानिक पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी कुटुंबीय व नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. राजकीय वर्तुळातही या घटनेवरून मोठे आरोप-प्रत्यारोप झाले होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास अधिकृतपणे आपल्या हाती घेतला.
आता उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर चित्र पूर्णपणे बदलले आहे. सीबीआयचे विशेष अधिकारी पुरण कुमार हे वैद्यकीय अहवाल, घटनास्थळाचा प्रत्यक्ष क्रम आणि जुन्या पुराव्यांची पुनर्तपासणी करणार आहेत. तसेच, या प्रकरणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या साक्षीदारांची नव्याने सखोल चौकशी केली जाईल.

सीबीआयच्या या थेट हस्तक्षेपामुळे दिशा सालियनच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नव्या घडामोडीमुळे थंडावलेल्या तपासाला पुन्हा गती मिळण्याची चिन्हे असून, प्रकरणातील सत्य अखेर समोर येण्याची आशा निर्माण झाली आहे.







