पुणे : कल्याणीनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये महिलांकडून कथित वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून एका कथित एजंटाला अटक केली असून, तीन महिलांची सुटका केली आहे. सुनिल साहेबराव कुर्हाडे (वय ३५, रा. राहुलनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील हॉटेल ईलाईट स्टे येथे तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीची पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली.

बनावट ग्राहकाने ठरल्याप्रमाणे पोलिसांना इशारा केल्यानंतर पथकाने हॉटेल ईलाईट स्टेवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान सुनिल कुर्हाडे याला ताब्यात घेण्यात आले. तसेच हॉटेलमधून तीन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, इम्रान खान नदाफ, अविनाशा कोडे, किरण बरडे, वैशाली खेडेकर आणि वैशाली इंगळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताची चौकशी सुरू केली असून, या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच महिलांना या व्यवसायात कशा प्रकारे आणण्यात आले, याचा तपास केला जात आहे.






