पुणे : पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि भरतीतील विलंबाविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी नुकताच ओंकारेश्वर ब्रिज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तीव्र रोष व्यक्त करत मोर्चा काढला. औषध निरीक्षक परीक्षेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारला 3 दिवसांची मुदत दिली होती, ज्याची मुदत आज 10 तारखेला संपत आहे.

मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी आणि संघटनांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधींना नोटिसा पाठवल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले आहे.

विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि वेळेवर निकाल लावण्याची मागणी केली आहे. तसेच औषध निरीक्षक आणि इतर परीक्षांमधील गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे.नोटीस मिळाल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न आल्याने आणि पोलिसांच्या नोटिसांमुळे आता विद्यार्थी संघटना कोणती पुढील भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






