पुणे : महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीच्या वादामुळे लांबणीवर पडली असून, आता ही परीक्षा थेट सप्टेंबरमध्ये घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या विलंबाचा सर्वाधिक फटका परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बसणार आहे.

नव्याने आणि पूर्ण सुरक्षिततेसह परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाला मोठा कालावधी लागणार आहे. नव्या प्रश्नपत्रिका तयार करणे, त्यांची काटेकोर पडताळणी करणे आणि सुरक्षेचे कडक नियम लागू करणे यासाठी किमान 2.5 ते 3 महिन्यांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे परीक्षा थेट सप्टेंबर महिन्यापर्यंत पुढे जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सध्या राज्यातील सुमारे ६ लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. अनेक विद्यार्थी गेल्या कित्येक महिन्यांपासून अहोरात्र अभ्यास करत आहेत. परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे या उमेदवारांना आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. शिक्षण विभागाने अजूनही परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, भविष्यात असे पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी सरकार एका महत्त्वाच्या पर्यायावर विचार करत आहे. आगामी काळात ही परीक्षा कॉम्प्युटरवर म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत शिक्षण विभागात हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यंदाची परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे कडक आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सध्या सर्व 6 लाख उमेदवारांचे लक्ष शासनाकडून येणाऱ्या अधिकृत तारखांच्या घोषणेकडे लागले आहे. ठाण्यात टीईटीचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या घोटाळ्यात दिल्लीतील काही व्यक्तींचा संबंध असल्याचे समोर आले असून पोलिसांनी आतापर्यंत 3संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील परीक्षा यंत्रणेवर मोठी टीका झाली होती.







