लातूर : दारूची तलफ झाल्याने एसटी महामंडळाच्या एका वाहकाने चक्क प्रवाशांनी खचाखच भरलेली गाडी रस्त्याच्या कडेला लावून दारूच्या गुत्त्यावर निघून गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. ही घटना लातूर – कळंब रस्त्यावरील काटगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली असून प्रवाश्यांना तब्बल दीड ते दोन तासापेक्षा जास्त वेळ ताटकळत बसावे लागले आहे. त्यामुळे एसटी महामंडळ या वाहकावर काही कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंब आगाराची एसटी बस ही सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ५० प्रवासी घेऊन लातूरवरून कळंबला निघाली होती. लातूरपासून जवळच असलेल्या काटगाव येथे आली. वाहकाने चालकाला बस रस्त्याच्या कडेला घ्यायला लावली. बस थांबताच वाहक गाडीतून उतरला आणि कोणालाही काही न सांगता थेट बस स्थानकापासून थोड्या अंतरावर असलेल्या दारूच्या गुत्त्यावर गेला.
तब्बल दीड तास झाला तरी तो परतला नाही. बसमधील प्रवासी वाट पाहून कंटाळले. चालकदेखील कंटाळून गेला. पण करणार काय? वाहक आल्याशिवाय त्याला बस पुढे नेता येईना. तिकीट काढल्याने प्रवाशी हतबल झाले. वैतागलेले काही प्रवासी बसमधून उतरून दुसऱ्या वाहनाने जाऊ लागले.
दरम्यान, अखेर प्रवाशांनी बसमधून उतरून ग्रामस्थांकडे विचारपूस केली. तेव्हा वाहकाचा प्रताप प्रवाश्यांना समजला. हा वाहक गेल्या तीन दिवसांपासून अशाच प्रकारे बस साईडला लावून जवळच्या दारूच्या गुत्त्यावर दारू प्यायला जात असल्याचे प्रवाशांना समजले आणि त्यांचा संताप अनावर झाला. ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशी थेट दारूच्या गुत्त्यावर पोहोचले.
याबाबत कळंबचे आगर प्रमुख मुकेश कोमटकर म्हणाले, “संबंधित वाहक यांच्याकडून घडलेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून एसटी बसमधील प्रवाश्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.”
‘माझ्या फोनची बॅटरी उतरली म्हणून आलो चार्ज करायला आलो’….
प्रवाश्यांनी वाहकाला जाब विचारताच, ‘माझ्या फोनची बॅटरी उतरली म्हणून आलो चार्ज करायला,’ असे सांगू लागला. संतापलेल्या प्रवाशांनी पकडून त्याला बसकडे आणले. तेव्हा कुठे चालकाने बस पुढे नेली. बेवड्या वाहकामुळे प्रवाशांना तब्बल दोन ते अडीच तास उशीर झाला. तर काही प्रवाशांना तिकीट काढूनही दुसऱ्या वाहनाने जावे लागल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.
एसटी महामंडळाचा दावा फेल…
स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सेवा देण्याचा तसेच एसटीच्या सुस्थितीची आणि चालक-वाहकाच्या ‘नो ड्रिंक’चा एसटी महामंडळाचा दावा यामुळे फेल गेला आहे. आता एसटी महामंडळ या वाहकावर काही कारवाई करणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.