पुणे : माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या दोन घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आल्या आहेत. एका प्रकरणात विवाहितेने गळफास घेतल्याची माहिती तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना मिळाली असून, पतीसह सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गंभीर आरोप तिच्या आईने केला आहे. दुसऱ्या प्रकरणात वॉशिंग मशीनसाठी 50 हजार रुपये आणण्याच्या मागणीवरून विवाहितेचा छळ करून तिला घराबाहेर काढल्याची तक्रार देण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात शमीम मुसा शेख (वय 40, रा. मातोजीनगर, बालेवाडी) यांनी लोणीकंद पोलिसांकडे दिलेल्या जबाबात मुलगी हिना असिफ पटेल हिचा विवाह 30 मे 2024 रोजी असिफ मशाक पटेल याच्याशी झाला होता. जावयाने नवीन गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. यासाठी कुटुंबीयांनी व्याजाने पैसे काढून दिले, तरीही मागणी सुरूच असल्याचा आरोप आहे. मुलीला कधी कधी जेवणही दिले जात नसल्याचे तसेच मुलगा आणि मुलगी झाल्यानंतरही तिचा छळ केल्याचे आईने जबाबात नमूद केले आहे.

17 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी मुलीशी फोनवर बोलताना ती रडत असल्याचे आणि आपल्याला खूप त्रास होत असल्याचे तिने सांगितल्याचे आईने म्हटले आहे. त्याच दिवशी दुपारी मुलीच्या नणंदेचा फोन आला आणि हिनाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी या घटनेच्या पार्श्वभूमीवर आईने पती, सासू, दीर आणि नणंद यांच्याविरोधात छळाचे आरोप केले आहेत. त्यानुसार पती असिफ मशाक पटेल (वय 24, सासू साहेरा बेगम मशाक पटेल (वय 42, व दिर सिदीप मशाक पटेल (वय 23, नणंद साबिया फिरोज शेख वय-26, सर्व रा. सिध्दीविनायक डेव्हलपर्स भरतवाडी पिंपरी सांडस, बागवानवस्ती ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सासरकडील महिलांची नावे आहेत.

दुसऱ्या प्रकरणात स्नेहल श्याम शेंडगे (वय 23, मूळ रा. उकडगाव, ता. श्रीगोंदा; सध्या रा. पेरणेगाव, ता. हवेली) यांनी पती, सासू, सासरे आणि नातेवाइकांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांचा विवाह 17 फेब्रुवारी 2024 रोजी श्याम रामदास शेंडगे याच्याशी झाला होता.
फिर्यादीनुसार, लग्नानंतर महिनाभराने सासरच्या मंडळींकडून मानपान आणि संसारोपयोगी वस्तूंवरून वाद घातले जाऊ लागले. 6 एप्रिल 2024 रोजी वॉशिंग मशीन घेण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. पैसे आणण्यास नकार दिल्याने पती, सासू आणि सासऱ्यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर मावस दीर आणि जावेनेही माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावल्याचे, तसेच पैसे आणले तरच घरात राहू देऊ, अशी धमकी देऊन घराबाहेर काढल्याचे स्नेहल यांनी तक्रारीत म्हटले आहे. मार्च २०२४ ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पती, सासू, सासरे, दोन नणंदा, मावस दीर आणि जावेने संगनमताने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पती श्याम रामदास शेंडगे वय-29) सासू मंदा रामदास शेंडगे (वय 50), सासरे रामदास लक्ष्मण शेंडगे वय-55), नणंद मनिषा रामदास शेंडगे (वय 21, व शितल सचिन लोंढे (वय 23, सर्व रा. उकडगाव ता. श्रीगोंदा, जि. अहील्यानगर, तसेच मावस दिर प्रकाश नारायण शिंदे (वय 32, जाऊ नामे सुनिता प्रकाश शिंदे (वय 30, रा. देलवडी ता. दौंड यांनी माहेराकडुन पैशाची मागणी शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







