पुणे : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या गंभीर प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे.. या संभाषण आणि ऑडिओ क्लिपची सखोल ‘फॉरेन्सिक तपासणी’ केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

दसरा मेळाव्यातील भाषणात जरांगे पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “भाजपकडून माझ्या नावावर 500 कोटी रुपये घेतले आहेत का? आणि घेतले असल्यास ते मला दिले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावर शिंदे यांनी स्वतः उत्तर न दिल्यास ऑडिओ क्लिप जाहीर करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. शिंदे गटाकडून पुरावे मागितल्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली.

ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर जरांगे पाटील आणि शिवसेना शिंदे गट या दोघांनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “या क्लिपची निष्पक्ष फॉरेन्सिक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाईल. जरांगे पाटील आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाला तसे आश्वस्त करण्यात आले आहे.”

मात्र, अडीच वर्षांनंतर हे संभाषण बाहेर आणण्यामागे नेमका काय हेतू आहे आणि कोणाला लक्ष्य केले जात आहे, असे प्रश्नही मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केले. सध्या राजकीय वर्तुळात यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असून फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच यामागचे खरे सत्य बाहेर पडण्याची शक्यता आहे






