पुणे : पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (दि. 23) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होत असलेल्या या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. पदवीधर मतदारसंघासाठी 47 तर शिक्षक मतदारसंघासाठी 30 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मात्र, मतदानाच्या दिवशीच पैशांच्या कथित वाटपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पैशांचा धुडगूस सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सावंत यांनी आरोप केला की, काही उमेदवारांकडून शिक्षकांना विकत घेण्यासाठी पैशांचे वाटप केले जात आहे. परवाच्या दिवशी प्रति शिक्षक 10,000 रुपये दिले जात होते, तर काल दुपारपासून ही रक्कम वाढवून 11,000 रुपये करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून यामुळे निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दत्तात्रय सावंत यांच्या या गंभीर आरोपामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे विविध राजकीय पक्षांमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे असून, विरोधी उमेदवारांकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत शांततापूर्ण आणि चुरशीने मतदान पार पडणार असून, निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.






