पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून ही घटना फुरसुंगीतील भेकराईनगरमध्ये सोमवारी (ता.५ ) सकाळच्या सुमारास घडली आहे. आरोपी पतीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय. ३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर, ज्योती राजेंद्र गायकवाड (वय २८) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेकराईनगर मधील गुरुदत्त कॉलनी भक्तनिवास या ठिकाणी गायकवाड दांपत्य राहत होते. राजेंद्र गायकवाड हा इंजिनियर म्हणून काम करतो. राजेंद्र हा पत्नीच्या चारित्र्यावर सारखा संशय घ्यायचा. याच कारणावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून भांडण सुरू होते. आज (ता.५) सकाळी याच कारणावरून त्यांच्यात वाद झाले.
दरम्यान, रागाच्या भरात राजेंद्र याने चाकूने पत्नीवर वार केले. यात ज्योती गायकवाड गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी पतीला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.