पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने तिच्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंबळी येथे ही घटना घडली आहे. राहुल सुदाम गाडेकर असं हत्या झालेल्या ३६ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंड विरोधी पोलिस पथकाने त्याची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर आणि भारतीय सैन्य दलातील प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे तसेच त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे अशा तीन जणांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राहुल गाडेकर याची पत्नी सुप्रिया गाडेकर हिने कोरोना काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव पांगा या ठिकाणी एक लॅब सुरू केली होती. ही लॅब चालवत असतानाच तिचे सुरेश मोटाभाऊ पाटोळे या भारतीय सैन्य दलातील जवानाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. याची माहिती राहुल गाडेकर याला झाल्याने दोन्ही नवरा-बायकोमध्ये सतत भांडण होत असायचे. त्यामुळे सुप्रिया हिने तिच्या प्रियकर सुरेश पाटोळे आणि त्याचा मित्र रोहिदास सोनवणे यांच्या मदतीने स्वतःच्या पतीचा खून करण्याचा कट रचला.
राहुल गाडेकर यांनी स्वतःचा १ कोटी रुपयाच टर्म इन्शुरन्स काढला होता, याची माहिती राहुलची पत्नी आणि तिच्या प्रियकराला होती. त्यामुळे राहुल गाडेकरचा मृत्यू झाल्यानंतर सुप्रिया त्याची वेबनाचे अर्धे पैसे सुरेश पाटोळे आणि रोहिदास गाडगे यांना देणार होती. त्यामुळे सुरेश पाटोळे आणि रोहिदास घाडगे यांनी राहुल गाडेकर हा आपल्या चाकण येथील कंपनीवर कामाला जात असताना पाठीमागून त्याच्यावर लोखंडी हातोड्याने वार करून त्याची हत्या केली.
राहुल गाडेकर याची हत्या केल्यानंतर सुरेश पाटोळे हा त्याच्या नोकरीसाठी हैदराबाद येथील प्रशिक्षण केंद्रावर रुजू झाला होता, तर रोहिदास घाडगे हा त्याच्या संगमनेर तालुक्यातील चिंचपूर गावात आपल्या घरी निघून गेला होता. आता या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.