कोरेगाव : ऊसाची वाहतूक वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करताना ट्रकने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना कोरेगाव (जि. सातारा) शहरात पंचायत समिती कार्यालयाजवळ आज रविवारी (ता.२९) पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वृद्ध दांपत्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
बजरंग नारायण काटकर (वय ५९) व पत्नी शोभा बजरंग काटकर (५५, दोघे रा. तांदूळवाडी, ता. कोरेगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या दांपत्याची नावे आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग काटकर व शोभा काटकर हे दोघेजण त्यांच्या कामानिमित्त दुचाकीवरून कोरेगाव शहरात चालले होते. त्याचवेळी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली ही कुमठे फाट्याच्या दिशेने निघाली होती.
तेव्हा ट्रॅक्टर ट्रॉलीला मालट्रक ओव्हरटेक करताना, ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकी सुमारे वीस ते पंचवीस फूट फरफटत गेल्याने काटकर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच, कोरेगाव पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिस कर्मचाऱ्यांनी काटकर दाम्पत्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र दोघांचाही मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, कटकर दाम्पत्य हे कोरेगाव शहराच्या दिशेने येत होते. त्यांच्या दुचाकीला पिशवी अडकवली होती. त्या पिशवीमध्ये भगवद्गीता होती. अपघातानंतर रस्त्याच्याकडेला पडलेल्या पिशवीतून भगवद्गिता पाहताच नागरिक देखील हळहळले.
याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर मालट्रक चालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.