वाघोली, (पुणे) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व हिंदू देवी-देवतांना सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिविगाळ केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाघोली येथील एका २१ वर्षीय तरुणावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शुक्रवारी (ता. ०६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सागर सावंत (वय- २१ रा. निओ सिटी मागे, बी.जे.एस. कॉलेज वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रविंद्र दिलीप पडवळ (वय- ३०, रा. वडकी गाव, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर सावंत याने पडवळ यांच्या बीड येथे राहणाऱ्या मित्राच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवर कमेंट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच हिंदु देवी-देवतांबद्दल अश्लील विधान केले. आरोपीने हिंदुंच्या धार्मिक भावनांचा अपमान करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, पडवळ यांनी याबाबत तक्रार देताच पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील सहायक पोलीस निरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.