Wagholi News वाघोली : सार्वजनिक नळावर पाणी भरताना झालेल्या वादातून एका गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारल्याने गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना वाघोली येथे शनिवारी (ता.१५) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Wagholi News)
रोहित रवी धोत्रे, रवी धोत्रे आणि शांताबाई रवी धोत्रे (सर्व रा. गोरेवस्ती गायरान, वाघोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घराजवळील सार्वजनिक नळावर पाणी भरत असताना त्यांच्या शेजारील रोहित धोत्रे याने फिर्यादीचा नळाखालील हंडा बाजुला सरकवला. त्यावर फिर्यादी यांनी त्याला माझा नंबर आधी आहे. तू मला पाणी भरु दे. माझे झाल्यानंतर तू पाणी भर असे सांगितले.
त्यानंतर आरोपी रोहित हा फिर्यादी महिलेला शिवीगाळ करु लागला. व त्याचे वडिल रवी धोत्रे व आई शांताबाई धोत्रे हे सुद्धा तेथे आले. तेही शिवीगाळ करुन दमदाटी करु लागले. त्यावर फिर्यादीने माझा नंबर पहिला आहे, मी पाणी भरते, त्यानंतर तुम्ही पाणी भरा, असे सांगितले. तेव्हा रोहित याने त्यांच्या गालावर चापट मारली. तर त्याच्या आई वडिलांनी हाताने मारहाण केली.
दरम्यान, आरोपी रोहित याने फिर्यादी यांच्या पोटावर लाथ मारल्याने त्या नळाजवळ पडल्या. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखू लागले. त्यांना ससून रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी गर्भपात झाल्याचे सांगितले. याप्रकरणी फिर्यादी यांनी लोणी कंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.