Wagholi News : लोणीकंद, (पुणे) : दारू पिताना झालेल्या भांडणात दोघांनी मिळून एकाचा धारदार शास्त्राने खून केल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
शैलेश मांडगीकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राम सुभाष श्रीराम (वय २५, रा. बेरळी बुद्रुक, मुखेड, जि. नांदेड), गोपाल ज्ञानोबा कोटालापुरे (वय २५, रा. नांदेड नाका, महादेवनगर जि. लातूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी संगम चंद्रशेखर धारिया (वय २३, रा. सिधावट खास, कुशीनगर, उत्तरप्रदेश) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Wagholi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटलापुरे, धारिया, श्रीराम, मांडगीकर कामगार आहेत. श्रीराम, कोटालापुरे, मांडगीकर बुधवारी (ता. १६) रात्री वाघोली-केसनंद रस्त्यावरील सिट्रोन सोसायटीसमोर दारू पित होते.
ठेकेदाराने मांडगीकरला श्रीरामच्या सांगण्यावरुन कामावरुन काढल्याने त्यांच्यात वाद झाला. मांडगीकरने श्रीराम आणि कोटलापुरे यांना दारुच्या नशेत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी मांडगीकर याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केला. (Wagholi News)
दरम्यान, खून करून पसार झालेल्या दोन्हीही आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील तपास करत आहेत.