लोणीकंद, (पुणे) : मुलांच्या वसतिगृहातून महागडे लॅपटॉप चोरी करणाऱ्या एका अट्टल ३९ वर्षीय गुन्हेगाराला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल २७ लॅपटॉप हस्तगत केले आहेत.
निलेश प्रफुलचंद कर्णावट (वय- ३९, रा. पाचोरा, जिल्हा जळगाव) असे जेरबंद केलेल्या चोराचे नाव आहे. त्याने आजतागायत ३९ गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली असल्याची माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी दिली.
पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॅपटॉप चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना विविध तंत्रज्ञानाच्या आधारे त्याची माहिती काढून त्याचा शोध सुरू केला असता सदर संशयित आरोपी हा रायसोनी कॉलेज रोडला उभा असल्याचे समजले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा रचून अलगद ताब्यात घेतले. त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने वाघोली, सिंहगड रोड, लोणावळा, सिम्बायोसिस, देहू, बिबवेवाडी आदी ठिकाणाहून लॅपटॉप चोरल्याचे कबुल केले. लॅपटॉप एक एक करून वेगवेगळया व्यक्तींना जळगाव जिल्ह्यात विकले होते. पोलीसानी त्या व्यक्तींच्या घरी जाऊन ११ लाख रुपये किमतीचे लॅपटॉप हस्तगत केले.
दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले कि, विद्यार्थ्यांसारखे राहायचे सकाळी सातपूर्वीच एखादे वसतिगृह गाठायचे जिथे दरवाजा उघडा दिसेल तेथून लॅपटॉप चोरी करून सॅक मध्ये टाकून निघून जायचे. विद्यार्थी म्हणून कोणाला संशयहि येत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच चोरीच्या गुन्ह्यात तो जून मध्ये कारागृहात गेला होता.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, रवींद्र गोडसे, पोलीस कर्मचारी स्वप्नील जाधव, बाळासाहेब सकाटे, अजित फरांदे, संदीप तिकोणे, सागर जगताप, विनायक साळवे, कैलास साळुंके, अमोल ढोणे, आशिष लोहार, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, साई रोकडे, दीपक कोकरे, शुभम चिनके, सचिन चव्हाण, प्रीतम वाघ, गहिनीनाथ बोमणे यांनी ही कामगिरी केली.