Wagholi News | वाघोली, (पुणे) : नगर रस्त्यावरील वाघोली येथील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी संगणक अभियंत्याचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीच्या पुणे पोलिसांनी केवळ चोवीस तासांतच मुसक्या आवळल्या आहेत.मोटारचालकाने केवळ तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंता तरुणाचा गळा चिरून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
भगवान केंद्रे (वय २३, रा. परतापूर, ता. कळंब, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. गौरव सुरेश उरावी (वय ३५, रा. खराडी, मूळ रा. शिवाजीनगर, अमरावती) असे खून झालेल्या संगणक अभियंता तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी लोहगाव-भावडी रस्त्यावरील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली. खराडी येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत गौरव नोकरी करत होता. तसेच तो मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गौरव जेवायला जातो, असे मित्रांना सांगून बाहेर पडला. मात्र, तो रात्री उशीरापर्यंत परतला नाही. शनिवारी दुपारी त्याचा खून झाल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मारूती पाटील आणि पथकाने तपास सुरू केला.
केवळ तीन हजार रुपयांसाठी…
तपासात गौरवचा खून आरोपी भगवान केंद्रे याने केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला कळंब तालुक्यातील परतापूर येथून पकडले. भगवान पुण्यात ॲप आधारित मोटार चालवत होता. गौरवने ॲपवरुन मोटारीची दोन वेळा नोंदणी केली होती. गौरव आणि भगवान यांची ओळख झाली होती. गौरवने मोटारचालक भगवान याचा मोबाइल क्रमांक घेतलेला होता. गौरव भगवानला तीन हजार रुपये देणे लागत होता.
दरम्यान, गौरवने वेळेवर पैसे दिले नसल्याने भगवान त्याच्यावर चिडला होता. शुक्रवारी रात्री भगवानने त्याला बोलावून घेतले. भगवान त्याचा साथीदार आणि गौरव मोटारीतून वाघोलीतील डोंगराच्या पायथ्याशी गेले. तेथे त्यांच्यात वादावादी झाली. भगवान आणि साथीदाराने गौरवच्या गळ्यावर शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Wagholi News | वाघोली येथे आयटीतील तरुणाचा गळा चिरून खून
Wagholi News : वाघोलीतील शासकीय जमिनीची देखभाल महापालिका करणार ; अतिक्रमणांना पायबंद बसणार?