Wagholi News : लोणीकंद, (पुणे) : पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर केल्याने चिडलेल्या ग्राहकाने थेट डिलिव्हरी बॉय ला मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. वाघोली (ता. हवेली) येथील वाघेश्वर मंदिराजवळ हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल
चेतन वसंत पडवळ असे मारहाण करुन गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. रोहित राजकुमार हुलसुरे असे मारहाण झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याप्रकरणी हलसुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पडवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हुलसुरे हा वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. मंगळवारी (ता. २४) आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर केली होती. पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर रोहितने उशिरा दिली. यावेळी संतापलेल्या आरोपीने रोहितला मारहाण केली.
या मरहाणीचा जाब विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र, राहुल आणि इतर काहीजण गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण करत त्याच्या कारमधून एक पिस्तूल काढून हवेत फायरिंग केली. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.