Vande Bharat Express | पुणे : मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वन्दे भारत एक्स्प्रेसवर पुणे विभागात मागील आठ दिवसात दोन ठिकाणी दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली तरी, रेल्वे सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई-सोलापूर वन्दे भारत ट्रेन पुणे मार्गे धावते. या ट्रेनला पुण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, ट्रेनवर पुणे विभागात मागील काही दिवसांमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या मार्गांवर १० फेब्रुवारी रोजी वन्दे भारत ट्रेनचे उद्घाटन झाले होते. या दोन्ही वन्दे भारत ट्रेनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दगडफेकीच्या ३० घटना…
वन्दे भारत ट्रेनवर गुरूवारी (ता. २०) लोणावळ्याजवळ आणि शनिवारी (ता. २२) हडपसर जवळ दगडफेक झाली आहे. यात ट्रेनची काच फुटली असून, एकही प्रवासी जखमी झाला नसला तरी गाडीची काच फुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वन्दे भारत ट्रेनवर होणाऱ्या दगडफेकींच्या घटनांमुळे रेल्वे सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे-लोणावळा, पुणे-मिरज आणि पुणे-दौंड असे तीन मार्ग आहेत. २०२२ मध्ये दगडफेकीच्या ३० घटना घडल्या आहेत.
दरम्यान, वन्दे भारत ट्रेन सुरू होण्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय झाला आहे. पहिल्या टप्प्यात दहा किलोमीटरची भिंत बांधली जाणार असून, ती दोन मीटर उंचीची असेल. लाखो रूपये खर्च करून भिंतीच्या कामालाही सुरुवात झाली आहे, पण, अद्याप या घटना रोखता आल्या नसल्याचे दिसून येते.
याबाबत बोलताना वरिष्ठ मंडळाचे सुरक्षा आयुक्त उदयसिंग पवार म्हणाले, “दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी आरपीएफकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. वारंवार दगडफेकीच्या घटना होणाऱ्या ठिकाणी आरपीएफच्या जवानांची नेमणूक केल्याने जवानांकडून या परिसरात जनजागृती केली जात आहे.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Vande Bharat Express : पुणे ; सिकंदराबाद ; शहरादरम्यान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’लवकरच धावणार
Vande Bharat | वंदे भारत रेल्वे सुसाट तब्बल ४ कोटींची केली कमाई