पुणे : पुणे-सातारा महामार्गावरून दुचाकीवरून चाललेले २ पोलिस गंभीर नायलॉन मांजामुळे जखमी झाल्याची धक्कादायक घटना शंकर महाराज उड्डाणपुलाजवळ रविवारी (ता.१५) घडली आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा गळा, तर दुसऱ्याचा हात चिरला आहे. हेल्प रायडर्स संस्थेचे स्वयंसेवक बाळासाहेब ढमाले यांच्या सतर्कतेमुळे पोलिसाचे प्राण वाचले आहे.
पोलीस कर्मचारी महेश पवार आणि सुनील गवळी अशी जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी महेश पवार आणि सुनील गवळी हे दोघे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत. रविवारी दुचाकीस्वार पवार आणि गवळी पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्या वेळी मांजा मानेला अडकल्याने पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली. तर गवळी यांचा हात मांजामुळे चिरला होता.
दरम्यान, याचवेळी हेल्प रायडर्स संस्थेचे स्वयंसेवक बाळासाहेब ढमाले हे शंकर महाराज उड्डाणपुलावरुन दुचाकीवरुन निघाले होते. त्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर प्रसंगावधान दाखवून पोलीस कर्मचारी पवार आणि गवळी यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.