उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील बोरीपार्धी ग्रामपंचायत हद्दीत सशस्त्र जबरी चोरी अथवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने अंधारात दबा धरुन बसलेल्या दोघांना यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे. रविवारी (ता. १२) पहाटे पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली आहे.
मारूती विष्णु पोळेकर (वय-२३), व अक्षय दादा मदने (वय – २०, रा. दोघेही पाटस, अंबिकानगर ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मारुती पोळेकर या एकट्यावर लोणी काळभोर, यवत, दौंड, लोणीकंद, भारती, लष्कर, बिबेवाडी, हडपसर, अशा विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १७ चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलिसांचे पोलीस पथक रविवारी पुणे-सोलापूर महामार्गावर गस्त घालीत असताना बोरीपार्धी ग्रामपंचायत हद्दीत विघ्नहर्ता हॉटेलजवळ दोन इसम हे घातक शस्त्रासह जबरी जबरी चोरी अथवा घरफोडी करण्याचे उद्देशाने आले असल्याची माहिती पोलीस नाईक कापरे यांना मिळाली होती.
मिळालेली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना दिली व त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक वाबळे यांना सदर ठीकाणी पोलीस स्टाफसह जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी पोलीस पथक गेले असता दोन अनोळखी इसम संशयितरित्या हालचाल करताना दिसुन आले.
सदर दोघांनाहि ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेजवळ एक लोखंडी कोयता, एक लोखंडी छनी, दोन एक्सापान, एक मोटार सायकल, एक चाकु, दोन मोबाईल आढळून आले. घातक शस्त्रासह जबरी चोरी अथवा घरफोडी करण्याच्या उद्देषाने एकत्रितपणे आले होते.
दरम्यान, आरोपी मारूती पोळेकर याच्यावर लोणी काळभोर, यवत, दौंड, लोणीकंद, भारती, लष्कर, बिबेवाडी, हडपसर, अशा विविध पोलीस ठाण्यात १७ घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याची कबुली तपासादरम्यान पोलिसांना दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वाबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु जाधव, पोलीस नाईक कापरे, आव्हाळे यांनी केली आहे.