लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी ०२ वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड तथा जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
अमित बालाजी सोनवणे (वय – २४), गणेश बाळु भोसले (वय -२० रा. दोघेही, माळीमळा, पाण्याच्या टाकीजवळ, लोणीकाळभोर, ता. हवेली) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित सोनवणे व गणेश भोसल यांच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर दुखापत करणे, जखमी करणे, मारहाण, शिवीगाळ, सामाईक इरादा, दुखापत पोचविण्याच्या उद्देशाने अंगावर धावुन जाणे, दंगा करणे, बेकायदेशीर जमावात सामिल होणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी संबंधीत आरोपींना शहर व जिल्ह्यातुन तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव परिमंडळ ५ चे पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख, यांना पाठविला होता. त्यानुसार विक्रांत देशमुख यांनी दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे दोघांना पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातुन दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.
सदरची कारवाई परिमंडळ ५ चे पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख, हडपसर विभागाचे पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, किरण धायगुडे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे यांनी केली.