पुणे : पाच लाख रुपये टोकन देऊन बीएमडब्ल्यू कार घेतली, मात्र उर्वरित पैसे देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन हरी वाटवे (रा. नांदेड सिटी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी प्रकाश गोविंद पिंगळे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश पिंगळे हे एका व्यक्तीकडे सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करतात. पिंगळे यांच्या मालकाला ३५ लाख रुपयांची तत्काळ गरज होती. त्यामुळे त्यांनी पिंगळे यांना बीएमडब्ल्यूकार विकून पैशाची व्यवस्था होते का पहा असे सांगितले. त्यानंतर पिंगळे यांनी आरोपी नितीन वाटवे यांच्यासोबत बीएमडब्ल्यू कारचा व्यवहार केला. आरोपी नितीन वाटवे याने टोकन अमाऊंट पाच लाख रुपये देऊन गाडीचा ताबा घेतला.
दरम्यान, आरोपी नितीन वाटवे याने उर्वरित पैसे देण्यासाठी एप्रिल २०२१ पासून टाळाटाळ केली. याप्रकरणी पिंगळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ताबडतोब मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.