पुणे: केंद्रीय महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेणाऱ्या मुलाकडून छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने ऑक्टोबरमध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकारचा तपास करण्यास सुरुवात करत १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली मुलगी केंद्रीय विद्यालयात शिकत होती. शाळेतून घरी ये-जा करताना १७ वर्षांचा एक अल्पवयीन मुलगा तिचा सातत्याने पाठलाग करत असे.
पाठलाग करत असताना तिला वाटेत अडवून मैत्री करण्यासाठी जबरदस्ती देखील करत असे. मुलाच्या याच त्रासाला कंटाळून मुलीने १२ ऑक्टोबर रोजी रहात्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली होती.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करताना तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी केंद्रीय विद्यालयातील शिक्षक, आत्महत्या केलेल्या मुलीच्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडे विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा तिच्याशी मैत्री करण्यासाठी त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून तपास करताना, पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पाठक अधिक तपास करत आहेत.