पुणे : कर्जाची परतफेड करूनही खाजगी सावकारांकडून वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश शंकर शिंदे (वय-५२) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तर शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीषा हजारे आणि एका अनोळखी इसम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे हे सहकार विभागात मुंबईतील कार्यालयात लेखाधिकारी होते. त्यांना मुंबईहून पुण्याला बदली करायची होती. बदलीसाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे होते. त्यासाठी शिंदे यानी विविध सावकारांकडून लाखो रुपयांचे कर्ज २० ते ३० रुपये टक्क्यांनी घेतले होते.
त्यानंतर, शिंदे यांनी खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड व्याजासहित केली होती. तरीसुद्धा सावकारांनी शिंदे यांच्यामागे वारंवार पैशांसाठी तगादा लावला जात होता. सावकारांच्या जाचाला कंटाळून अखेर गणेश शिंदे यांनी आत्महत्या केली.
दरम्यान, आरोपी शंकर गायकवाड, विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीषा हजारे आणि एका अनोळखी इसम यांच्याविरोधात फराजखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास फराजखाना पोलीस करीत आहेत.