सोलापूर : सोलापूर शहरात घरफोडी करून चोरीच्या पैशातून ७० लाखाची मालमत्ता खरेदी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोकड व सोन्याचे दागिने असा तब्बल २५ लाख ९३ हजार ३५७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उमेश खेत्री व सुरेश सासवे अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत.
सोलापूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश खेत्री व सुरेश सासवे हे दोघेजण मित्र आहेत. या दोघांवर कर्नाटक राज्यात चोरी, मारामारी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, दरोडा असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तेथून फरार होऊन दोन्ही आरोपी गेल्या दीड वर्षापासून सोलापुरात आले आणि इथेच ते राहू लागले.
सुरेश सासवे हा दिवसभर सोलापूर शहर व परिसरातील बंद घरे याची रेकी करीत असे, तर उमेश हा रेकी केलेल्या घरांची घरफोडी करीत होता. मागील चार वर्षापासून सोलापूर शहरात दहा ठिकाणी आरोपींनी चोऱ्या केल्या आहेत.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना वरील दोन्ही आरोपींना सोलापूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पकडले. पोलिसांनी आरोपी उमेश खेत्री व सुरेश सासवे यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. हे ऐकून पोलीसही चक्रावून गेले.
दरम्यान, उमेश खेत्री याने चोरीच्या पैशातून आपल्या नातेवाईकांच्या नावाने चुंगी येथे ३ एकर शेती आणि संजवाड येथे २ एकर शेती अशी पाच एकर शेतजमीन ४४ लाख रुपये किंमतीला विकत घेतली आहे. या शिवाय मुळेगाव येथे तीन प्लॉट त्यांच्या नावावर आहेत. तसेच आरोपींकडे दोन दुचाकी आणि दोन चारचाकी गाड्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून रोकड व सोन्याचे दागिने असे २५ लाख ९३ हजार ३५७ रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. आरोपींनी सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली. तरी, पुढील तपास सोलापूर पोलीस करीत आहेत.