शिक्रापूर : पुणे नगर महामार्गाच्या रस्त्यालगत असलेल्या सणसवाडी (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीतील भैरवनाथ मंदिरातील देवाच्या चांदीच्या पादुका व त्रिशुल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश सोनबा हरगुडे (वय-४३, रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब गाडे हे भैरवनाथ मंदिराचे पुजारी आहेत. ते नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास मंदिरात नित्यपूजा करण्यासाठी गेले असता त्यांना मंदिरातील देवासमोर असलेल्या चांदीच्या पादूका व त्रिशुल आढळून आले नाही.
त्यानंतर गाडे यांनी तत्काळ यासंदर्भात सुरेश हरगुडे यांना फोन करुन ही माहिती दिली. त्यानंतर सुरेश हरगुडे व गोरक्ष भुजबळ हे मंदिरात आले. त्यांनी मंदिर व परिसरात पादूका व त्रिशुलचा शोध घेतला मात्र त्या कोठेही आढळून आल्या नाहीत.
या घटनेची माहिती मिळताच, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, पोलीस हवालदार आत्माराम तळोले, पोलीस शिपाई लखन शिरसकर, किशोर शिवणकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये एक व्यक्ती मंदिरात येऊन पादुका व त्रिशुल बॅगमध्ये घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी सुरेश हरगुडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुन्ना मुत्तनवार करत आहेत.