पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अनुषंगाने शोध घेतला असता, पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली असून, तीन लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. कुणाल सुरेश बधे (वय २९, धंदा- वायरमन, रा. मु. पो. रांजणे, ता. वेल्हा, जि. पुणे) असे अटक केलेल्या वाहनचोराचे नाव आहेत. ही कारवाई अमृत खान, लिपाणे वस्ती येथे केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना सराईत वाहनचोर लिपाणी वस्ती येथे चोरीची दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपी कुणाल बधे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीची (क्र. एम.एच. १२, बीटी १५३८) चौकशी केली असता, दुचाकी चोरीची असल्याची कबुली आरोपीने दिली.
दरम्यान, पोलिसांनी अधिक तपासणी केली असता, आरोपीकडून जप्त केलेल्या दुचाकीबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, दुचाकी जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच त्याच्याकडून ३ लाख रुपये किमतीच्या ५ दुचाकी जप्त करुन भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलीस ठाण्यातील दुचाकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.