यवत : दारोदार मायबाप, कुणाचे पाप? ही उक्ती सर्वश्रुत आहे. वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्याच दिवट्या मुलांनी आपल्याच आजीला व वडिलांना शिवीगाळ व दमदाटी करून घराबाहेर हाकलून दिल्याची घटना वरवंड (ता. दौंड) येथे घडली आहे. वडिलांनी सज्ञान होईपर्यंत सांभाळ केला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्याच दिवट्या नातवांनी दोघांना बाहेरचा रस्ता दाखवावा, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. याप्रकरणी आजीने यवत पोलीस ठाण्यात दोन नातवांविरुद्ध तक्रार दिली आहे.
संदीप दत्तात्रय गवळी, प्रदिप दत्तात्रय गवळी (रा. दोघेही वरवंड, ता. दौंड ) असे या नातवांची नावे आहेत. याबाबत आजी वैजयंता भगवान गवळी (वय- ७५, रा. सदर) यांनी यवत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप, प्रदिप, व वडील व आजी हे वरवंड या ठिकाणी एकत्र राहत होते. यावेळी घरामध्ये भांडणे झाली. यावेळी संदीप व प्रदीप यांनी ७५ वर्षीय आजीला धक्के मारून बाहेर काढले. तसेच वडील दत्तात्रय गवळी यांनाही दोघेजण म्हणाले, दोन्ही सदनिका आमच्या आहेत व तुम्ही आमच्या घरात रहायचे नाही, तुम्ही घराच्या बाहेर व्हा! असे म्हणून बाहेर काढले.
दरम्यान, आजी वैजयंता म्हणाल्या कि आम्ही कोठे जाणार, आम्हाला कोणाचा आधार नाही अशी विनवणी करूनसुद्धा दोन्ही नातवांनी आजीला शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच वडील दत्तात्रय हे चालवित असलेले किराणा मालाचे दुकानाचा ताबा घेवुन वैजयंता आणि मुलगा दत्तात्रय गवळी यांना घरातुन बाहेर हाकलुन दिले. याबाबत वैजयंता गवळी यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यवत पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.