छत्रपती संभाजीनगर: सातारा परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकेला अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तब्बल 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाच देण्याची इच्छा नसलेल्या शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती. ठरल्याप्रमाणे सापळा रचून शिक्षिकेने ओढणी झटकली आणि 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकासह पंटरला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत अडकलेले आरोपी म्हणजे मुख्याध्यापक सोमनाथ भागोजी भावले (वय 52 वर्ष, रा. वसंत विहार, बीड बायपास) आणि गणेश रामनाथ कोथिंबीरे (वय 26 वर्ष, रा. सातारा गाव) हा शाळेतील संगणक ऑपरेटर आहेत.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला शिक्षिकेने मुख्याध्यापक भावले यांच्याकडे अर्जित रजा मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र भावले यांनी रजा मंजूर करण्यासाठी ऑपरेटर कोथिंबीरेच्या माध्यमातून तब्बल 20 हजार रुपयांची लाच मागितली. या मागणीवर शिक्षिकेने तात्काळ एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शिक्षिकेने कोथिंबीरे याच्याकडे मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून 20 हजार रुपये दिले. पैसे मिळताच शिक्षिकेने ठरल्याप्रमाणे ओढणी झटकून पथकाला इशारा दिला. लगेचच एसीबी पथकाने धडक कारवाई करत मुख्याध्यापक भावले आणि ऑपरेटर कोथिंबीरे यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत 20 हजार रुपयांची लाचेची रक्कम आणि दोघांकडील दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई अधीक्षक माधुरी कांगणे, उपाधीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सचिन बारसे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.







