पुणे : आई-वडिलांची देखभाल करण्यासाठी घरात असलेल्या नोकराने दाम्पत्याला गुंगीचे ओैषध देऊन ४० तोळे सोन्याचे दागिने, रोकड, हिरेजडीत दागिने असा २४ लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना मुंढवा येथे घडली आहे. याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी नरेश शंकर सौदा (वय-२२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे आई-वडील निवृत्त झाले आहेत. आई-वडिलांची देखभाल तसेच घरातील कामे करण्यासाठी त्यांना नोकराची गरज होती. ऑनलाइन नोकर उपलब्ध करुन देणाऱ्या एका खासगी कंपनीकडून त्यांनी मुंबईतून नरेशला पुण्यात कामासाठी बोलावून घेतले होते. गेल्या महिनाभरापासून तो ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरी काम करत होता.
सौदाने जेवणातून आई-वडिलांना गुंगीचे ओैषध दिले. घरातील सोन्याचे दागिने, रोकड, हिरेजडीत दागिने असा २४ लाख रुपयांचा ऐवज लांबवून सौदा पसार झाला. ज्येष्ठ दाम्पत्याला दुसऱ्या दिवशी जाग आली. तेव्हा घरातून दागिने चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, सोसायटीतील एका रहिवाशाने या घटनेची माहिती मुंढवा पोलिसांना दिली. प्राथमिक तपासात आरोपी सौदा मूळचा नेपाळचा आहे. सौदाची चारित्र्य पडताळणी न करता त्याला कामावर ठेवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.