हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापुर महमार्गावर कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. कदमवाकवस्ती (स्टेशन), कुंजीरवाडी व उरुळी कांचन गावातील चौकात पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरील खाजगी वाहने कमी झाली असली तरी, वहातुक नियमांना ठेंगा दाखवून धावणारी अवैध प्रवासी वाहने मात्र वरील तीनही चौकात उभी असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
हडपसर ते चौफुला या दरम्यान अवैध प्रवासी वाहतुक करणारी वहाने प्रवाशी मिळवण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर उभी असल्याचे चित्र रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना दिसुन येत असले तरी, लोणी काळभोर पोलिसांना मात्र ती दिसत नाहीत याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. लोणी काळभोर पोलिसांचा वाहतूक शाखा व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे “माया”वी संबंधामुळे अवैध प्रवासी वाहतुक करणारी वहानांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसुन येत आहे.
हडपसरहुन लोणी काळभोर, उरुऴी कांचन, यवतसह चौफुल्याला जाणाऱ्या प्रवाशांची नेहमीच हडपसरहुन उरुळी कांचनपर्यंत ठिकठिकाणी वर्दळ नेहमीच पहायला मिळते. हडपसरहुन लोणी काळभोरमार्गे यवत, चौफुल्याला जाण्यासाठी तीन चाकी रिक्षांपासून टेम्पो आणि कारमध्ये देखील बिनधास्त बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू असते.
जलद वाहन मिळत असल्याने प्रवासी देखील कसालाही विचार न करता या वाहनांमध्ये बसतात. जास्त पैशांच्या हव्यासापोटी तीनचाकी रिक्षासह सहा आसनी रिक्षाचालकही आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात कोंबतात आणि जास्त फेऱ्या मारण्यासाठी भरधाव वेगाने वाहने पळवतात.
हडपसरहुन यवतकडे रोज पाचशेहुन अधिक बेकायदा प्रवाशी वहातुक करणारी वाहने धावत असुन, संबंधित वाहन चालकाकडे परिवहन कार्यालयाचे (आरटीओ)चे फिट प्रमाणपत्र नसणे, वाहन पासिंग, वाहनांचा वीमा न करणे, चालकाकडे वाहन परवाना नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, खासगी वाहने प्रवाशी वाहतुकीसाठी वापरणे अशा कित्येक प्रकारे नियमांना धाब्यावर बसवले जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांना लहान-लहान बाबींमध्ये देखील नियमाचा बाऊ दाखवून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणारे वाहतूक पोलीस अवैध प्रवासी वाहतुकीबद्दल एक शब्द ही बोलत नाहीत, कारवाई तर खूप लांबची बाब बनली आहे.
दरम्यान, पुणे-सोलापुर महामार्गावर मागिल काही महिन्यांपासून अवैध प्रवासी वाहतूकीचे प्रमाण वाढू लागल्याने वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे. लोणी स्टेशन चौक, कुंजीरवाडी व उरुळी कांचन गावातील चौकात पोलीस दिसत असले तरी, कोंडी मात्र कायम दिसते.
चौकात उभे असणारे पोलीस नेमके काय काम करतात करतात, याविषयी लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत. नेमणूक एकीकडे तर काम दुसरीकडे केले जात असल्याने अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कुणाचाच धाक राहिला नाही.
तीन चाकी रिक्षाचा परवाना असताना रिक्षाला अतिरिक्त प्रमाणात लोखंडी जाळ्या बसवून तसेच सीट्सची संख्या वाढवून चालकासह नऊ जणांची भरती सर्हासपणे केली जाते. त्यामुळे प्रवाश्यांच्या जीवाशी हे लोक खेळत आहेत. याकडे संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी कानाडोळा करीत आहेत. आरटीओने दिलेले नियम न पाळल्याने मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार आहे. : सचिन उत्तम चांदणे (कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, ता. हवेली)