पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्क्यावर धक्के देण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. ठाकरे गटातील ६ खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर, आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात सामील होत सर्वांनाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, अहिर यांना शिंदे गटाने थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची मोठी जबाबदारी दिली आहे, ज्यामुळे ठाकरे गटाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या राजकीय धामधुमीत पुण्याचे ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. मोरे यांनी दावा केला आहे की, त्यांना देखील शिंदे गटाकडून पक्षात येण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली होती. शिंदे गटातील एका वरिष्ठ नेत्याने मोरे यांच्याशी संपर्क साधला होता. “शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत, तुम्ही आमच्या पक्षात आलात तर तुम्हाला मोठे पद दिले जाईल आणि महानगरपालिकेत तुम्हाला हक्काचे कार्यालयही मिळेल,” अशी मोहक ऑफर त्यांना देण्यात आली होती.

मात्र, वसंत मोरे यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. त्यांनी त्या नेत्याला प्रतिप्रश्न केला की, “तुमच्याकडे सध्या अनेक बडे नेते असताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची तुम्हाला गरज का भासली?” त्यावर त्यांना उत्तर मिळाले की, मोरे यांची सोशल मीडियावरील पकड आणि जनतेमध्ये असलेली त्यांची प्रभावी प्रतिमा पक्षवाढीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. मात्र, मोरे यांनी ही ऑफर धुडकावून लावली आणि या संवादाची माहिती लगेचच खासदार संजय राऊतयांना दिली. या घटनेनंतर ठाकरे गटाने वसंत मोरे यांना पुण्यातील महानगर प्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली. दरम्यान, ऑपरेशन टायगर अंतर्गत आणखी किती नेते शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






