पुणे : कर्जदाराने हप्ते थकविल्याने त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पोलिसांनी कर्जदारांच्या ऐवजी जामिनदाराला अटक करण्याची भीती दाखवल्याने, जामिनदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील एक अधिकारी व हवालदारावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
राजेंद्र राऊत असे आत्महत्या केलेल्या जामीनदाराचे नाव आहे. तर समर्थ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक भाग्यवान ज्ञानदेव निकम व पोलीस हवालदार सचिन रामचंद्र बरकडे, तर किरण भातलावंडे (रा. गवळी वस्ती, मांजरी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांची मुलगी वैष्णवी राजेंद्र राऊत वय २३, रा. नाना पेठ यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण भातलावंडे हा फिर्यादी यांचे वडिल राजेंद्र राऊत यांचा मित्र होता. किरण याने रघुवीर बिजनेस प्रा. लि. हैदराबाद यांच्याकडून टाटा सुमो विक्टा ही गाडी घेतली होती. घेतलेल्या कजार्साठी राजेंद्र राऊत हे जामीनदार होते. परंतु किरण याने कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे सहायक पोलीस फौजदार भाग्यवान निकम व हवालदार सचिन बरकडे हे राऊत यांच्याकडे वारंवार कोर्टाचे वॉरंट बजावण्यासाठी येत होते. ते त्यांना अटक करण्याची भीती दाखवत होते. अटक होऊ नये, यासाठी त्यांनी वेळोवेळी ७ ते ८ हजार रुपये दिले होते. या सर्व त्रासामुळे राऊत यांनी किरण याला कर्ज फेडण्यास सांगितले.
तेव्हा किरण याने कर्ज फेडण्यास नकार देऊन धमकी दिली. या त्रासाला कंटाळून राजेंद्र राऊत यांनी सोमवारी सकाळी ६ वाजता घराबाहेरील पॅसेजमध्ये नायलॉनचे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे व सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी घटना स्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.