उस्मानाबाद : घरात शिजवलेलं मटण कुत्र्याने खाल्लं, याचा राग मनात ठेवून संपातलेल्या पित्याने मुलीवर गोळ्या झाडल्या होत्या. यात मुलीचा मृत्यू झालेला. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात कार्ला इथं अडीच महिन्यांपूर्वी घडलेल्या या धक्कादायक हत्याकांडप्रकरणी फरार असलेल्या मुलीच्या पित्याला पोलिसांनी अटक केली. अडीच महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली होती.
१८ सप्टेंबर रोजी हत्याकांड घडले असून या प्रकरणात उस्मानाबाद येथील नळदुर्ग पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल केला होता. मुलीची हत्या करून फरार असलेल्या बापाच्या पोलीस मागावर होते. गेले अडीच महिने तो कुठे लपून बसला होता, यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरु केला होता. दरम्यान आयटी विभागाच्या मदतीने पोलिसांना अखेर मारेकरी बापाचा शोधही लागला होता.
फरार आरोपी बाप सांगली जिल्ह्यातील चिखली येथे एका शेतातील घरात वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपाला अखेर बेड्या ठोकल्या. या अडीच महिन्यांच्या काळात तो सतत जागा बदल होता. पोलिसांना गुंगारा देण्याचा त्याचा हा प्रयत्न अडीच महिन्यांपर्यंत यशस्वी झाला, परंतु अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याच.
काजल शिंदे नावाची मुलगी माहेरी आली होती. एका रविवारी माहेरी मटण आणले गेले. मटणाची ग्रेव्ही बनवून काजल इतर कामाला लागली. यावेळी कुत्र्याने मटण खाल्ल्याचं काजलच्या आईच्या निदर्शनास आल्याने आईला राग आला. मुलीने मटण शिजवून झाल्यानंतर लक्ष दिलं नाही, म्हणून ते कुत्र्याने फस्त केले, असे म्हणत आई आणि मुलीत वादाची ठिणगी पडली.
दारूच्या नशेत असणाऱ्या आरोपी बापाने हा प्रकार पाहिला आणि संतापाच्या भारत खुंटीवर टांगलेली गावठी बंदूक काढून निशाणा लावला. गोळी थेट मुलीच्या छातीत गुसली. नातेवाईकांनी तिला रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनीही काजलच्या वडिलांवर गुन्हा नोंदवून घेतला होता.