विशाल कदम
लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपूलावरील कठडे प्रवाशांना धोकादायक ठरत असून कठड्यांना धडकून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यातच श्रीक्षेत्र थेऊरकडे दुचाकीवरून चाललेल्या एका तरुणाचा कठड्याला धडकून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी (ता.२७) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
नितीन विजय शेलार (वय-२५, सध्या रा. बिबवेवाडी पुणे, मूळ रा. वडगाव रासाई, ता. शिरूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शेलार हा त्याच्या कामानिमित्त दुचाकीवरून श्रीक्षेत्र थेऊरकडे निघाला होता. रस्त्यावरून जात असताना, थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपूलावरील कठडा न दिसल्यामुळे कठड्याला जोरदार धडक बसली. या अपघातात शेलार हे दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले होते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी शेलारला तातडीने लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. शेलार यांच्या तब्बेतीमध्ये आता सुधारणा होत आहेत. असे तेथील डॉक्टरांनी सांगितले आहे.
थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपूलावरील कठडे हटविण्याची नागरिकांची मागणी
थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपूलावरील कठडा हा धोकादायक असून त्यामुळे या उड्डाणपुलावर नेहमी किरकोळ व छोटे-मोठे अपघात होत आहेत. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने मोठा अपघात होण्यापूर्वीच तेथील कठडे हटवावे. अशी मागणी पूर्व हवेलीतील नागरिकांकडून होत आहे.