जुन्नर (पुणे) : १५ दिवसांच्या नवजात मुलीच्या अपहरणाचा बनाव रचून जन्मदात्या आईनेच नकोशीला पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथील डाव्या कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी निर्दयी महिलेला शुक्रवारी (ता.३) अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळे येथील ग्रामीण रुग्णालयात नवजात मुलीला डोस देऊन माता घरी येत होती. यावेळी अज्ञात इसमाने आईला धक्का देऊन तिच्या १५ दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अपहरण केल्याची तक्रार आळेफाटा पोलिसांकडे शुक्रवारी (ता. ०३ फेब्रुवारी) आली होती. मात्र, पोलिसांनी घटनेनंतर २४ तासांत निर्दयी आईचे बिंग फोडले आहे.
बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवताना महिलेने सांगितलेल्या घटनाक्रमामुळे पोलिसांना महिलेवर संशय आला. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केले असता, घडलेल्या घटनेपासून सीसीटीव्ही पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर चेक केले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बालिकेच्या आईला ताब्यात घेत अधिक तपास केला असता, आईने नवजात बाळाला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात टाकून दिल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.
दरम्यान, या महिलेला पहिल्या तीन मुली तर चौथा मुलगा आहे. वंशाला अजून एक दिवा हवा म्हणून या कुटुंबाने अजून एका अपत्याला जन्म दिला. पण पुन्हा मुलगीच झाल्याने या जन्मदात्या आईने या नवजात मुलीला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात सोडून दिले असावे. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.