पुणे : गारवा बिर्याणी हॉटेलच्या मॅनेजरचा खून प्रेम प्रकरणातूनच झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सिंहगड रोड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह चौघांना ताब्यात घेतले आहे.
अनिकेत मोरे, धिरज सोनवणे यांच्यासह आणखी दोघे अशा चौघांना सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भरत भगवान कदम (वय २४) असे खून झालेल्या मॅनेजर तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भरत यांचा भाऊ प्रकाश कदम यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात प्रसिद्ध असलेल्या हॉटेल गारवा बिर्याणी या हॉटेलचा भरत हा मॅनेजर होता. शनिवारी रात्री तो हॉटेल बंद करून दुचाकीने घरी निघाल्यानंतर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा खून करण्यात आला होता. भरतच्या डोक्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. हि घटना धायरी येथील धायरेश्वर मंदिराजवळ घडली होती. याप्रकरणाचा सिंहगड रोड पोलीस तपास करत होते.
सदर घटनेचा सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. स्थानिक पोलिसांचे इंटिलिजन्स, तांत्रिक तपास व पोलिसांनी केलेल्या कौशल्याने खून अनिकेत मोरे व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे समोर आले.
त्यानूसार, या चौघांना ताब्यात घेतले. तपासातून हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे स्पष्ट झाले. अनिकेत मोरे याच्या मैत्रिणीने त्याच्याशी वाद झाल्यानंतर बोलणे बंद केले होते. ती भरत याच्याशी बोलत होती. त्याचा राग अनिकेतच्या मनात होता. त्यावरून काही महिन्यांपूर्वी भरत व अनिकेत यांच्यात वाद देखील झाले होते. त्यानंतर अनिकेतने भरत याचा काटा काढण्याचा प्लॅन रचला. त्याने अनिकेत कधी आणि कोणत्या रस्त्याने घरी जातो, याची रेकी केली. ही माहिती घेऊन त्याने या चौघांना पुरविली. त्यानंतर आरोपींनी भरत याचा दोन दिवसांपुर्वी रात्री साडे बाराच्या सुमारास घरी जात असताना खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, सिंहगड रोड पोलिसांनी या खूनाचा छडा लावत एका अल्पवयीन मुलासह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. प्लॅनिंग करून खून करण्यात आला असून, मुख्य आरोपीने मॅनेजरची पूर्ण माहिती काढल्यानंतर त्यांनी मध्यरात्री खूनाचा थरार घडवून आणला होता.