पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कोयता गँगचा म्होरक्या व त्याच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसेच पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत एका बुधवारी (ता. ११) एका रात्रीत ३२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कोयता गँगचा म्होरक्या बिट्या कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्याच्याकडून दोन कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच पोलिसांची आतापर्यंतची कोयता गँग विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांचे मागील दोन दिवसांपासून कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये रात्रभर पोलीस शहरातील वेगवेगळ्या भागात झाडाझडती करत आहेत. बुधवारी (ता. ११) रात्रभर केलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान ३२ जणांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून ३८ कोयते जप्त केले आहेत. यामध्ये कोयता गँगचा म्होरक्या बिट्या कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांचाही समावेश आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरुन अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबवून कामगिरी केली आहे.